मुंबई: “हमासने गेल्या काही दिवसांत जो काही अत्याचार, नरसंहार चालवला आहे, तो मानवतेला काळीमा फासणारा आहे. विश्व हिंदू परिषद इस्रायलच्या पाठीशी आहे. जोपर्यंत हमासचा एक एक दहशतवादी ठेचत नाही, तोवर आपले अभियान थांबवू नका,” असे विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष यानिमित्त बजरंग दलाच्या वतीने सिंधुदुर्ग ते मुंबई अशा शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरेश जैन पुढे म्हणाले की, “जगभरातील मुस्लिम समाज हमासच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने उभा आहे हे दुर्दैवी आहे. स्त्रियांवरील अत्याचार, मंदिरे उद्ध्वस्त करणे हे प्रकार मागील १४०० वर्षे होत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अनुकरणीय आहेच. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरणही करणे आवश्यक आहे. त्यांनी औरंगजेबाशी १२५ लढाया केल्या व जिंकत आले. औरंगजेबाने धोका देऊन त्यांना पकडले, अनन्वित अत्याचार केला. पण संभाजी महाराजांनी धर्मांतर केले नाही. म्हणूनच त्यांचा धर्मवीर म्हणून गौरव केला जातो,” असेही ते म्हणाले.
दादर येथील राजा बढे चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, अभिनेते राहुल सोलापूरकर, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा, निवृत्त लेफ्टनंट कर्नल जगदीप सिंह मनचंदा, भजनसम्राट अनुप जलोटा, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बजरंग दलाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
: