कुडाळ (मुळदे): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली घटक उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित “दीक्षारंभ” कार्यक्रमाच्या निमित्ताने नवागत तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी एंटी-रॅगिंग जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी प्रास्ताविक करताना एंटी-रॅगिंग समिती व एंटी-रॅगिंग पथकाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी 2009 सालच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांनुसार गठित या समितीमध्ये पोलिस विभाग, महसूल विभाग, माध्यम प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि पालक प्रतिनिधी यांचा समावेश कसा केला जातो याचे स्पष्टीकरण दिले. तसेच प्रत्येक घटक सदस्याची जबाबदारी व भूमिका अधोरेखित करून विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या आत व बाहेर मैत्रीपूर्ण वातावरण टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.

बैठकीत कुडाळ येथील दैनिक तरुण भारतचे पत्रकार श्री. प्रमोद ठाकूर यांनी सामाजिक माध्यमांच्या गैरवापरातून रॅगिंग कशी वाढीस लागते यावर भाष्य करून विद्यार्थ्यांना सावध केले. तर सागर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज वर्क्स, कुडाळ MIDC या संस्थेचे प्रतिनिधी व स्वयंसेवी कार्यकर्ते श्री. प्रकाश सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वर्तनाची जबाबदारी व शिस्तीचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व रॅगिंगच्या वास्तविक घटनांचा दाखला देत विद्यार्थ्यांना त्याचे गंभीर परिणाम सांगितले. त्यांनी सर्वांना एकमेकांमध्ये बंधुभाव, आपुलकी व स्नेहभाव वाढवून शैक्षणिक वातावरण शिस्तबद्ध राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संदीप गुरव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.







