कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ येथील बसस्थानकावरून विजयदुर्ग-सावंतवाडी बसने तळवडे येथे जाताना अज्ञाताने एका महिलेकडील पिशवी फाडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स चोरीस गेली. सुप्रिया जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपण दि. ६ मे दिवशी ११.३० वाजण्याच्या सुमारास तळवडे येथे जाण्यासाठी कुडाळ बसस्थानकावर आले. आपल्यासोबत मुली, जावई व अन्य नातेवाईक होते. ११.४५ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकावर आलेल्या विजयदुर्ग-सावंतवाडी बसमध्ये आपण चढले. तिकीट काढण्यासाठी वाहक आपल्याकडे आला असता पर्स काढण्यासाठी आपण पिशवी उघडण्यास गेले, तर पिशवीचा वरचा भाग फाटलेला दिसला. आत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स होती. ती शोधली असता सापडली नाही. त्यानंतर आपण पर्स घरी विसरले नसेन ना, याची खात्री करण्यासाठी घरी गेले व खात्री केली असता पर्स घरी सापडली नाही. त्यानंतर आपण कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ५० सहस्र रुपये किमतीचा २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १२ सहस्र ५०० रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाचा आणखी एक सोन्याचा हार, ४५ सहस्र रुपये किमतीच्या १८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १२ सहस्र ५०० रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, २० सहस्र रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे कानातले चार जोड, चांदीच्या दोन बांगड्या, २ सहस्र ५०० रुपये किमतीची सोन्याची लहान अंगठी व रोख ३०सहस्र रुपये मिळून १ लाख ७३ सहस्र रुपयांचा ऐवज चोरीस गेला. दरम्यान चोरीस गेलेल्या एकूण ५७ ग्रॅम वजनाच्या सोन्याची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास ३ लाख ८४ सहस्र , रुपये किंमत आहे.
Home क्राईम विजयदुर्ग-सावंतवाडी बसने प्रवास करणाऱ्या महिलेकडील पिशवी फाडून आतील सोन्याचे दागिने व रोख...