India Vs Austalia Test: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. फिरकीपटूंनी आपल्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचवलं. पण असं असलं तरी मोहम्मद शमीच्या आक्रमक खेळीची चर्चा रंगली आहे. आता त्यानेच या मागचं गुपित सांगितलं.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. एक डाव आणि 132 धावांनी हा विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे वाटचाल सुरु केली आहे. हा सामना रविंद्र जडेजा आणि आर.आश्विन या फिरकीपटूंनी गाजवला. पण असं असलं तरी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फलंदाजीची जोरदार चर्चा रंगली. फलंदाजीत आक्रमकता पाहून उपस्थितांनी बोटं तोंडात घातली. मोहम्मद शमीने 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. आता या खेळीमागचं गुपित उघड झालं आहे. बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अष्टपैलू अक्षर पटेलनं त्याचा इंटरव्यू घेतला. त्यात मोहम्मद शमीनं आपल्या आक्रमक खेळीबाबत सांगितलं.
व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षर पटेलनं विचारलं, “आज आमच्यासोबत नागपूरमध्ये मिस्टर लाला आले आहेत. इतक्या आत्मविश्वासाने आले. काय विचार करत होता?” शमीने या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, “काही नाही मित्रा..तू तिथे फलंदाजी करत होता. माझी फक्त एकच भूमिका होती. जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर टिकून राहावं.धीर धरावा. पण तसं होत नव्हतं.” त्यानंतर अक्षरने त्याला पुन्हा विचारलं की, “मी सांगत होतो की, थंड राहा. मी बोललो डोक्यावर बर्फ ठेव..तू षटकार मारला..मी पुन्हा बोललो की, डोक्यावर बर्फ ठेव तू पुन्हा षटकार मारला.” शमीने या प्रश्नाला आपल्या शैलीत उत्तर देत म्हणाला, “ईगो हर्ट होत होता.”