३० मे वार्ता: वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल? यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित येवून नवा आराखडा तयार करत आहे. जवळपास १० हजार कोटी खर्चाचा हा आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात पालघरची भूकंपग्रस्त गावे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील दरडग्रस्त आणि वादळात सापडणारी गावे अशी गावं समाविष्ट होणार आहेत. भूअंतर्गत विज वाहिन्या, अत्याधुनिक निवारा केंद्रे आणि पक्क्या घरांचे नवे स्ट्रक्चर अशा काही उपाययोजना या आराखड्यात आखल्या जाणार आहेत. फयाण, क्यार, निसर्ग, तौक्के अशा वादळांमुळे गेल्या २० वर्षांत कोकणात खूप मोठे नुकसान झाले आहे. या प्रत्येक वादळात सरासरी २ हजार कोटींची हानी झाल्याचे वादळानंतरच्या नुकसानीच्या आढाव्यातून पुढे आले आहे.
समुद्रकिनारपट्टींच्या सर्वचजिल्ह्यांमध्ये भूअंतर्गत वीज वाहिन्यांचे नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होता. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हेही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेषतः सह्याद्री पट्टयातील दरडग्रस्त गावे या नव्या आराखड्यात आहेत.