७ जुलै वार्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच वर्ष २०२४ पर्यंत मुख्यमंत्री रहाणार आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर विश्वास ठेवला पाहिजे. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्य परिस्थिती सांगितली आहे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्याविषयी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे अन् मोठे आहे. राज्य सरकारने त्यांच्या म्हणण्यावरून अनेक निर्णय घेतले. विकलांग मंत्रालय त्यांच्याच मागणीवरून करण्यात आले आहे. पूर्वी त्यांना जो मान नव्हता, तो या सरकारमध्ये मिळाला. भविष्यात कोणते ना कोणते मोठे दायित्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना देतील.पुढे ते म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देश यांच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का यावे लागले? वेगळे व्हावे लागले हे मांडले आहे. त्यामुळे हे कशामुळे झाले आहे, हे पाहिले पाहिजे.