८ जुलै वार्ता: राष्ट्रवदीच्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी दिल्यामुळं शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. कारण या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळेत अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रीपदाची संधी देण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. असं असतांना रात्री वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस हे रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर रात्री १:२४ मिनीटांनी फडणवीस तेथून बाहेर पडले. मंत्रीमंडळाच्या अनुषंगाने रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.