Home स्टोरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का केली जाते ?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का केली जाते ?

57

संपादकिय: दिवाळीच्या कालावधीत येणार्‍या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्कि पुराणानुसार अलक्ष्मी कलि राक्षसाची दुसरी पत्नी असून अधर्म आणि हिंसा यांची मुलगी, तर मृत्यू अन् अधर्म यांची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ, वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार आणि अज्ञान यांची देवता आहे. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल (हत्या) आणि लोभ या ठिकाणी रहाणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीची कथा आहे, तर श्रीसूक्तामध्ये ‘अलक्ष्मी नाश्याम्यहं’, म्हणजेच ‘अलक्ष्मीचा नाश व्हावा’, असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव आहे, तर तिच्या हातातील झाडू हे आयुध (शस्त्र) आहे. ती अलक्ष्मी घरात येऊ नये; म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. याच झाडूच्या साहाय्याने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते, अशी त्यामागची भावना आहे.

 

१.झाडूची पूजा कशी करावी ?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजन झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळद-कुंकू लावून पूजा करतात. पूजा झाल्यावर रात्री विलंबाने (उशिराने) नवीन झाडूने घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात.

 

२.झाडूचे महत्त्व

झाडूला पाय लावू नये. चुकून लागला, तरी लगेच नमस्कार करावा. झाडूने कुणालाही मारू नये. अगदी लहान मुले किंवा प्राणी यांनाही मारू नये. कुणी घराबाहेर पडले की, लगेच झाडलोट करू नये.

 

३.लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व

समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवर श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून सिद्ध केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या दिवशी त्यांच्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून ‘चोपडा (वही) पूजन’ करतात, तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात.