१६ जून वार्ता: कर्तव्य बजावत असताना पोलिसाला कानशिलात मारल्या प्रकरणी बारामती राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहिते यांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी कासुर्डी टोल नाका येथे घडली. कासुर्डी या ठिकाणी फिर्यादी कोहक व त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक रोकडे हे शासकीय कामावर हजर असताना आषाढी वारीनिमीत्त पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचे काम करत होते. त्याचवेळी एका कारमधून येत डॉ. वंदना यांनी पुण्याकडे जाताना पोलीसाशी हुज्जत घातली व कोहक यांच्या डाव्या गालावर कानशिलात लगावली. त्यानंतर डॉ. वंदना गाडीतून खाली उतरून बॅरिगेटिंग बाजूला काढत पुण्याच्या दिशेने निघून गेल्या.
यवत पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा केल्या प्रकरणी डॉ. वंदना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. वंदना यांना यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री राहत्या घरातून अटक केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने कामकाज पाहत आहेत.