सेवेकर्यांमध्ये अपूर्व उत्साह: गुरुपूजनासाठी उसळला जनसागर….
नाशिक (प्रतिनिधी): शरीर चंदनाप्रमाणे झिजवून सेवेकर्यांनी राष्ट्रभक्तीसह दीन, दु:खी अन् पीडितांची सेवा करावी आणि घेतला वसा सोडू नये असा उपदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केला.सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या पावन उपस्थितीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात दि. ३० जून व १ जुलै असा गुरुदर्शन सोहळा सेवेकर्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीत पार पडला. देशभरातून आलेल्या सेवेकर्यांना दुसर्या दिवशीही गुरुमाऊलींनी संबोधित केले.
गुरुमाऊली म्हणाले की, आज हजारोंच्या संख्येने नूतन सेवेकरी स्वामींची सेवा करण्यासाठी वचनबद्ध झाले आहेत. सेवामार्गात येणे आणि जाणे अतिशय सोपे आहे. मात्र टिकून राहणे अतिशय अवघड आहे. आज जे सेवेकरी आले आहेत ते शतजन्माची पुण्याई घेऊन आले आहेत. अशा भाग्यवान सेवेकर्यांनी आपल्या पुण्याईच्या बळावर दु:खी-कष्टी लोकांची सेवा करावी, सेवामार्गाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन नित्यसेवा करावी आणि स्वामींचे सेवाकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले.परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या हितगुजातून उच्च गुरुभक्तीचे अनेक दाखले दिले. गुरुमाऊलींनी दधिची ऋषींचा देहत्याग, परमपूज्य पिठले महाराजांचे आजन्म सेवाव्रती कार्य, एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रुपात राहून भगवान श्रीकृष्णाने केलेली सेवा, भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अलौकिक कार्य याविषयीचे सविस्तर विवेचन केले.
गुरुमाऊली म्हणाले की, दधिची ऋषींच्या देहत्यागानंतर त्यांच्या हाडांची वज्रे तयार करुन देवांनी असुरांचा पराभव केला आणि विजयश्री प्राप्त केली. असा त्याग आणि याच तोडीचे सेवाकार्य परमपूज्य सद्गुरु पिठले महाराजांनी आजन्म केले. संत शिरोमणी एकनाथ महाराजांच्या निस्सीम भक्तीमुळे त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी देखील श्रीखंड्याच्या रुपात राहून १२ वर्षे सेवा केली. आजही भगवान श्रीकृष्ण गुप्तरुपाने येऊन पैठणचा रांजण भरुन जातात. भगवान श्रीकृष्णांना महाभारतकारांनी २६ पदव्या दिल्या आहेत तर रामायणकारांनी ‘मर्यादा पुरुषोत्तम’ ही दिव्य पदवी प्रभु श्रीरामांना दिली आहे. संत आणि अवतारी विभूतींचा जीवनादर्श सेवेकर्यांनी अंगिकारावा असे गुरुमाऊलींनी नमूद केले.
मूल्यशिक्षण, विवाह मंडळ, कृषी, आयुर्वेद, मराठी अस्मिता-भारतीय संस्कृती, वास्तूशास्त्र आदी महत्त्वपूर्ण विषयांवरही गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केले. यावेळी गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे, श्री. नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.गुरुदर्शन अन् शनिप्रदोषगुरुचरित्र या दिव्य ग्रंथामध्ये शनिप्रदोष माहात्य वर्णिले आहे. शनिवार दि. १ जुलै रोजी शनिप्रदोष दिनी हजारो सेवेकर्यांना परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन आणि आशीर्वादाचा लाभ घडला, गुरुमाऊलींनीही आपल्या हितगुजामध्ये शनिप्रदोष पर्वावर गुरुदर्शन घेणारे सेवेकरी महत् पुण्यवान आहेत असा उल्लेख केला.