गोवा मुक्तीतील हुतात्म्यांना वाहिली आदरांजली!
गोवा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता ३ दिवसांच्या गोवा दौर्यासाठी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पणजी येथील आझाद मैदानात हुतात्मा स्मारकाला भेट देऊन गोवा मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. सायंकाळी राजभवनावर दरबार सभागृहात राष्ट्रपतींचे नागरी स्वागत करण्यात आले. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांची ही पहिलीच गोवा भेट आहे.
विविध क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक ! – राष्ट्रपती मुर्मू!
राज्यात विविध क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. गोव्यातील लोक उत्सवप्रेमी आहेत आणि त्यांचे आदरातिथ्य उत्तम आहे. राज्यातील लोक देश-विदेशात उत्तम कामगिरी बजावत आहेत, असे उद्गार राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी राजभवनात नागरी स्वागताला उत्तर देतांना काढले. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या भाषणात गोव्यातील समृद्ध वनक्षेत्राचा उल्लेख केला. १८ जून या क्रांतीदिनाच्या आठवणींना उजाळा दिला आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्या योगदानाचे स्मरण केले. गोव्यातील समान नागरी कायद्याचे कौतुक केले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रपती मुर्मु यांनी भाषणाचा प्रारंभ आणि शेवट कोकणीतून केला.