विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन
सावंतवाडी: विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातनू सावंतवाडीत १७ एप्रिल रोजी ‘रामजन्मोत्सव ‘ मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त शहरात भव्य शोभायात्रा निघणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष केशव फाटक यांनी दिली.
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख किशोर चिटणीस, प्रकाश रेडकर, प्रसाद अरविंदेकर, राजू केळुसकर, राजा वाडकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील श्री देव नारायण मंदिर येथून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात झांज पथक, भजन, ढोल पथक, डिजे , शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मंडळाचा सहभाग असणार आहे. यावेळी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, राम जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात सकाळी ११.३० वाजता वेदशास्त्र पाठशाळेच्या विद्यार्थ्यांचे मंत्रपठण, दुपारी १२ वाजता राम जन्म, ४ वाजता शोभा यात्रा, सायंकाळी ६ वाजता किरण सिध्दये यांचे अभिनव संगीत महाविद्यालय माठेवाडा यांचा गीत रामायण संगीताचा कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता सातपाटेकर दशावतार, निरवडे यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त हिंदू बांधवानी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.