Home Uncategorized राजकीय नेते, सत्ता आणि असमर्थ पोलीस प्रशासन..!

राजकीय नेते, सत्ता आणि असमर्थ पोलीस प्रशासन..!

174

संपादकिय ✍️: काल मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सावंतवाडी शहरात पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.  भाजप आणि शिंदे गटात जिल्ह्यात आधीपासून वाद सुरु आहेत. मात्र काल संध्याकाळी भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपली मर्यादा ओलांडली. सावंतवाडी शहरात झालेल्या या राड्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. सत्ताधारी सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे काल झालेल्या राड्यामुळे सिद्ध झाले. काल सावंतवाडी शहरात दोन गटात झालेल्या राड्यात जे राजकीय पदाधिकारी दिसून येत होते ते पदाधिकारी काही काळापूर्वी  एकत्र बसत उठत होते. यावेळीच्या विधानसभा इलेक्शनच्या वेळेस सुद्धा हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र वावरत होते. मात्र नगरपालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसिंधुदुर्ग जिल्ह्यात पालक मंत्री नितेश राणे विरुद्ध आमदार निलेश राणे असे चित्र दिसून आलं.

गेल्या काही दिवसात काही ठिकाणी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काही ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत धाड टाकत व रोख रक्कम ही  पकडून दिली. २ डिसेंबर रोजी होत असताना १ डिसेंबरच्या रात्री मालवण शहरात  दिड लाख रुपये रोख रक्कम सहित काही व्यक्तींना पोलिसांनी पकडल्याची घटना घडली. हे सर्व होत असतानाच काल २ डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना  भाजप आणि शिंदे या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. यावेळी भाजपचे पदाधिकारी विशाल परब यांच्या ड्रायव्हरला मारहाण झाली. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी विशाल परब तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.

घडलेल्या घटनेबाबत सावंतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माहिती घेत होते. असं असताना सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्येच दोन गटांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी योग्य तो तपास करत असताना  पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना ही पोलीस प्रशासनाला लाजवणारी आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या अधिकारांवर गालबोट लावणारी आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी भर पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना भिडत होते. तसेच हाणामारी करण्यासाठी पुढे येत होते आणि पोलिसांनी किती समजावलं तरी पोलिसांना हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऐकत नव्हते. थोडक्यात सांगायचं तर पोलिसांनाल किंमत शून्य असंच चित्र सर्वसामान्य लोकांना रात्रीच्या घटनेमुळे बघायला मिळालं. सत्तेची आणि पैशाची पावर पोलिसांना ही नमवू शकते,  पोलिसांना भारी पडू शकते असं काल रात्री पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या घटनेमुळे सिद्ध झालं. ज्या अर्थी रात्री सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांना हुडकावून लावत एकमेकांना भिडत होते, याचा विचार करता पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावेळी पोलिसांनी योग्य ती कारवाई करत त्यांच्या अधिकारांचा वापर करणे गरजेचे होते. पोलिसांच्या अंगावर धावून जाणं तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं न ऐकणं आणि पोलीस स्टेशनमध्ये दंगा करणं हे सर्व सुरू असताना पोलिसांनी आपल्या अधिकारांचा वापर केला नाही. त्यामुळे सत्ता आणि पैसा पोलिसांवर भारी पडते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हाच दंगा जर सामान्य नागरिकांनी स्वतःच्या हक्कासाठी जरी केला असता तर त्या व्यक्तीवर अनेक गुन्हे लागले असते   त्या व्यक्तीवर लाठी चार्ज झाला असता आणि ते व्यक्ती आज तुरुंगामध्ये असते. मात्र हे दोन राजकीय गटातील व्यक्तींनी केलं असता आज कोणी तुरुंगात नाही किंवा कोणावरहि लाठीचार्ज झाला नाही. त्यामुळे पोलिसांचा दबाव किंवा पोलिसांचे कायदे हे सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत काय?  असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारे जर राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांना ऐकत नसतील, तसेच भर पोलीस स्टेशनमध्ये कायद्याचे उल्लंघन करत असतील आणि पोलीस कोणती कारवाई करत नसतील तर पोलीस सक्षम आहेत की नाहीत? असाही प्रश्न उपस्थित होतो.

तसेच मोठ्या राजकीय  नेत्यांनी सत्ता आणि पैस्याच्या बळावर काहीही केलं तरी पोलीस त्यांचं काही करू शकत नाहीत. पोलीस हे पोलीसगिरी सर्वसामान्य व्यक्तीलाच दाखवणार आहेत. अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. त्याचप्रमाणे अशा घटना जर वारंवार घडायला लागल्या तर पोलीस प्रशासनाची किंमत कमी होईल हे नाकारता येणार नाही. सत्य पुढे, राजकीय नेत्यांपुढे पोलीस हतबल आहेत. ट असे चित्र काल मंगळवार २ डिसेंबर रोजी सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये दिसून आलं.