Home स्टोरी राज्य सरकारचा मोठा निर्णय, शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल!

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल!

202

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष राज्यात सरकारी नोकरभरती निघाली नव्हती. त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थांना आता अर्ज करता येत नव्हते. त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने आज याबाबतचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत आज परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.शासनाच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातला परिपत्रक आज जारी केलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात ७५००० नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. त्या नोकर भरतीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरेल. खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा यामुळे ३८ एवजी ४० वर्ष होईल. तर मागास प्रवर्गासाठी कमाल वरील वयोमर्यादा ४३ ऐवजी ४५ वर्षे होईल. वयोमर्यादेतील ही सूट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील.सामान्य प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलेय ?….शासनाच्या निर्णायाच्या दिनांकापासून ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन २५ मार्च २०१६ च्या शासन निर्णायात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्ष) दोन वर्ष इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष) देण्यात येत आहे. ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित करणास्तव संदर्भाधीन दि. २५ मार्च २०१६ मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठीदेखील या शासन निर्णायाच्या दिनांकापासून ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष इतकी शिथिलता देय राहिल. शासन निर्णायाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही. अशा सर्व जजाहिरातींसाठी देखील वरील वयोमर्यादा शिथिलता लागू राहिल. त्यानुसार संबंधित जाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी. ३१ डिसेंबर २०२३ नंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संदर्भाधीन २५ मार्च २०१६ च्या शासन निर्णायात अथवा संबधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील.