सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रायगडावर २ जून या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० व्या राज्याभिषेक साजरा होत आहे. या वेळी गडावरील महाराजांच्या पुतळ्यावर देशभरातील १ सहस्र १०८ हून अधिक ठिकाणांहून आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३५० गड-दुर्गांवरून आणलेल्या जलाचाही समावेश आहे. हे जल असलेल्या कुंभाचे २६ मे या दिवशी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांनी षोडशोपचार पूजन केले. यानंतर या जलकुंभाच्या रथयात्रेला शुभारंभ झाला. या वेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेशाचे षोडषोपचार पूजन झाले. राज्यपाल महोदयांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
या वेळी ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हिंदु धर्म की जय’ या घोषणांनी राजभवनाचा परिसर दुमदुमून निघाला. या वेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर, तसेच विविध शिवप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी पूजाविधी सांगितला. या वेळी राज्यपाल आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी मनोगत व्यक्त केले.
राज्यपालांच्या हस्ते भगवा फडकवून रथयात्रेला प्रारंभ!
राज्यपाल रमेश बैस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भगवा ध्वज फडकावल्यानंतर या रथयात्रेला प्रारंभ झाला. देशातील विविध जलाशयातील जल असलेला कुंभ विविध गावांमध्ये जाऊन २ जून या दिवशी रायगडावर पोचणार आहे.*शिवकालीन शस्त्रांची लक्षवेधी प्रात्यक्षिके !*या वेळी मावळ्यांच्या पोशाखात दांडपट्टा, तलवार, भाला आदी शस्त्राबाजीची प्रात्यक्षिके राज्यपाल महोदयांच्या समोर सादर करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये युवकांसह युवतींनी नऊवारी साडीमध्ये ही प्रात्यक्षिके करून दाखवली.*छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती ! – रमेश बैस, राज्यपाल*छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व भारतियांसाठी प्रेरणादायी आहे. शिवरायांनी सामान्य शेतकर्यांसाठी मातृभूमीचे रक्षण करणारी सेना निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा होऊ शकल्या. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामध्ये देशभक्तीची भावना होती.
हे रयतेचे राज्य असल्याचा संदेश पोचवण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
राजमाता जिजाऊंनी रामायण आणि महाभारत सांगून शिवरायांना घडवले. प्रभु रामचंद्र हे शिवरायांचे आदर्श होते. भारतावर आक्रमण करणारे राजे होऊन गेले; परंतु ते स्वत:साठी जगले. चाणक्यांनी २ सहस्र वर्षांपूर्वी ज्या राज्याचे वर्णन केले, तो राजा छत्रपती शिवरायांच्या रूपाने जन्माला आला. असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला, हे आमचे भाग्य आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा खरा अर्थ ‘रयतेचे राज्य’ असा आहे. हा संदेश जनतेपर्यंत पोचवण्यासाठी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.