Home स्टोरी राज्यातील निरक्षरांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण होणार !

राज्यातील निरक्षरांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण होणार !

97

२० ऑगस्ट वार्ता: देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना ‘साक्षरतेतून समृद्धीकडे’ जाण्यासाठी ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्या अंतर्गत १५ वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी राज्यात १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. या अभियानातून राज्यात वर्ष २०२३ – २४ मध्ये १२ लाख ४० सहस्र निरक्षर नागरिकांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शिक्षण विभागाच्या योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी या संदर्भातील सूचना परिपत्रक काढून दिल्या. सद्यःस्थितीत राज्यातील निरक्षरांची नावनिहाय माहिती उपलब्ध नसल्याने, तसेच जनगणनेस १२ वर्षांहून अधिक कालावधी उलटल्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित करणे, त्यांना ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देणे’, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर १७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करायचे आहे. या मोहिमेअंतर्गतच शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीमही राबवण्यात येणार आहे. सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी क्षेत्र निश्चित करून सर्वेक्षक शिक्षक यांची नियुक्ती करावी. सर्वेक्षणामध्ये शाळा, गाव, तालुका आणि जिल्हानिहाय निरक्षरांची माहिती गोळा केली जाणार आहे. निरक्षरांचे नाव, लिंग, जात, प्रवर्गनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. शिक्षकांना माहिती गोळा करावी लागेल. त्यांची सर्वेक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल.