Home स्टोरी राज्याच्या कारागृहात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन, व्हिडीओ कॅमेऱ्यांनी नजर असणार

राज्याच्या कारागृहात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन, व्हिडीओ कॅमेऱ्यांनी नजर असणार

85

राज्याच्या कारागृहात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने ड्रोन, व्हिडीओ कॅमेऱ्यांनी नजर असणार आहे. देशात यापूर्वी उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रात कारागृहांच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरा वापरला जाणार आहे. मंगळवारी पुणे येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण केंद्रात मोजक्याच कारागृह कर्मचाऱ्यांना ड्रोन, व्हिडीओ कॅमेरा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता

अपर पोलिस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या पुढाकाराने राज्याच्या कारागृह विभागात मनुष्यबळाचा तुटवडा, अद्ययावतीकरण, सुसज्ज सुरक्षा यंत्रणा, कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न आणि बंदीजनांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. राज्यात बहुतांश कारागृहे ही ब्रिटिशकालीन निर्मित आहेत. आता या भागात नागरी वस्त्यांची वाढ झाल्याने कारागृहांच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही कारागृहे राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असल्यामुळे कारागृहात काय सुरू आहे, हे रस्त्यावरून सहजतेने दिसून येते.

मुंबईचे ऑर्थर रोड, पुण्याचे येरवडा, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, तळोजा, अमरावती व नागपूर या नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये सुुरक्षेसाठी ड्रोन, व्हिडिओ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे तसेच कल्याण, चंद्रपूर जिल्हा कारागृहासह अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुले कारागृहातही ड्रोनद्वारे सुरक्षा केली जाणार आहे. मध्यवर्ती कारागृहातील चार तर, जिल्हा कारागृहातील तीन असे कर्मचारी ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षण घेणार आहेत.