सिंधुदुर्ग: राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाचे तज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, स्ट्रक्चरल डिझाईनर विकास रामगुडे, मुंबईतील आयआयटीचे अभियंता प्रा. जांगीड आणि मेटलर्जी अभियंता प्रा. परीदा यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागील नेमकी कारणे कोणती याचा शोध ही समिती घेणार आहे. याविषयीचा अहवाल कधीपर्यंत सादर करावा, याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नसून अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राजकोट दुर्गावर शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी समितीची स्थापना !
राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये भारतीय नौदलाचे प्रतिनिधी कमोडोर एम्. दोराईबाबू, ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर’चे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजी आंग्रे यांचा समावेश आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार यांना या समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून घेण्यात आले आहे. नवीन पुतळ्याविषयीची संकल्पना, कामाचे स्वरूप, कार्यपद्धती यांचा अभ्यास ही समिती सरकारला सादर करेल. याविषयीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश सरकारने समितीला दिले आहेत.