कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबीयांना डावलून रासणे यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई: कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याचं वृत्त आहे. दोन्ही मतदारसंघातील आमदारांचं निधन झाल्याने ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार देऊ नका, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना फोन केला. एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर त्या मतदारसंघात उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा विरोधी पक्षाने जपावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या या फोनला विरोधी पक्षाकडून कसा प्रतिसाद दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरेंना फोन नाही
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला नसल्याचं सांगितलं जातं. शिंदे हे येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना फोन करू शकतात असंही सांगितलं जातं. मात्र, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
फडणवीस करणार फोन
दरम्यान, कसबा आणि चिंचवडसाठी अर्ज भरण्याचा 7 फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीत उमेदवार न देण्याचं आवाहन करणार आहेत.
स्वत: फडणवीस यांनी आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश येतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.