सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छी विक्रीसाठी वेंगुर्ला, शिरोडा, नियती या भागातून आलेल्या मच्छी विक्रेत्या महिला सावंतवाडी शहरात रस्त्यांवर ठीक ठिकाणी बसून मच्छी विक्री व्यवसाय करत असायच्या त्यामुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरायची. यावर सावंतवाडी नगरपरिषद त्यांच्यावर नेहमीच कारवाई करायची. असे कित्येक दिवस चालूच होतं. परंतु आज शहरातील मच्छी मार्केट मध्ये व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी सुद्धा रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास नगरपरिषदेला भाग पाडले. त्यावर नगरपरिषदेने आज रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्या महिलांच्या टोपलीमध्ये फिनेल ओतून कठोर कारवाई केली असता सदर मच्छी विक्रेत्या महिलांचे खूप मोठे नुकसान झाले व त्यांनी थेट सामाजिक बांधिलकींच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता या प्रकरणाची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते व वकील अशोक पेडणेकर यांनी सामाजिक भान ठेवून सदर मच्छी विक्रेत्यां महिलांच्या भावना समजून घेऊन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व अशोक पेडणेकर यांना बोलून घेतले. तसेच या प्रकरणावर योग्य तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही सदर ठिकाणी बोलून घेतले. जेव्हा नगरपरिषदेचे कर्मचारी रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर कारवाई करायला रस्त्यावर उतरतात त्यावेळी या महिला आपल्या माशाच्या टोपल्या घेऊन सैरावैरा कशाही रस्त्यावरून धावत असतात. असं असताना एक महिला धावत्या बसच्या खाली येता येता वाचली होती.
हातावरचे पोट असणाऱ्या या महिलांचा जीव कधीच धोक्यात येऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकीने पुढाकार घेऊन सदर नगरपरिषदेच्या माध्यमातून १५ मच्छी विक्रेत्या महिलांना मच्छी मार्केट मध्ये दिवसा प्रत्येकी तीस रुपये भरून कायमची व हक्काची जागा मिळवून देऊन उन्हा- पावसामध्ये बसून व इकडे तिकडे फिरून मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना मच्छी व्यवसाय करण्यासाठी कायमची जागा देऊन एक मोठा दिलासा दिला आहे.
यासाठी सदर महिलांनी सामाजिक बांधिलकीचे आभार मानले आहेत. तसेच सामाजिक बांधिलकीने सुद्धा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. यासाठी सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर व रवी जाधव तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी सहाय्यक कार्यालय निरीक्षक आसावरी केळबाईकर, लिपिक परविन शेख व रुजवान शेख या सर्वांनी मिळूनहि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. परंतु उद्यापासून रस्त्यावर कोणीही मच्छी विक्रेता मच्छी विक्री करण्यासाठी बसल्यास त्यावर नगरपरिषदेकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले.