रत्नागिरी: रत्नागिरी खेड तालुक्यातील एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी (ता. ३) हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सूर्यकांत नवनाथ चव्हाण असे फाशी ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी या खटल्यात जोरदार युक्तिवाद केला.

खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ ला शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरदेखील ती सापडली नाही म्हणून तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलै २०१८ ला अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एकाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी संशयित सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले.पोलिसांच्या चौकशीअंती सूर्यकांत याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मृतदेह कुठे लपवला आहे, याची माहिती दिली.
खेड पोलिसांनी सूर्यकांत याला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६(आय), ३६३, ३६४, २०१ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व दंड अशी शिक्षा सुनावली आहे.