Home स्टोरी रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! –...

रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्‍यपाल रमेश बैस

92

मुंबई: रतन टाटा यांनी चहा, मीठ, स्‍टील, ‘ऑटोमोबाईल्‍स’, ‘आय्.टी.’, विमानबांधणी अशा वैविध्‍यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योगाला जागतिक समूहात रूपांतरित केले. रतन टाटा केवळ एक व्‍यक्‍ती नाहीत, तर संस्‍था आहेत. ते उद्योग, नवीन उपक्रम आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ आहेत, असे गौरवोद्वार महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल रमेश बैस यांनी काढले. टाटा उद्योग समूहाचे संस्‍थापक अध्‍यक्ष रतन टाटा यांना राज्‍यशासनाच्‍या पहिल्‍या ‘उद्योगरत्न’ पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले. रतन टाटा यांच्‍या वतीने टाटा उद्योग समुहाचे अध्‍यक्ष चंद्रशेखरन् यांनी पुरस्‍कार स्‍वीकारला. या वेळी ‘उद्योगरत्न’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक’ हे पुरस्‍कारही प्रदान करण्‍यात आले.

 

२० ऑगस्‍ट या दिवशी शहरातील ‘जिओ वर्ल्‍ड कन्‍व्‍हेन्‍शन सेंटर’ येथे हा कार्यक्रम पार पडला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत या वेळी उपस्‍थित होते. ‘उद्योगमित्र पुरस्‍कार’ आदर पुनावाला, ‘उद्योगिनी पुरस्‍कार’ गौरी किर्लोस्‍कर यांना, तर ‘उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक पुरस्‍कार’ विलास शिंदे यांना प्रदान करण्‍यात आला. ‘उद्योगरत्न’ पुरस्‍कार २५ लाख रुपये, ‘उद्योगमित्र’ पुरस्‍कार १५ लाख रुपये, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक’ पुरस्‍कार ५ लाख रुपये, तसेच सर्व पुरस्‍कारांसह सन्‍मानचिन्‍ह आणि मानपत्र असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.