सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्यासह महत्त्वाच्या रेल्वेगाडयांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. यासाठी रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सावंतवाडीकरांचा हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणीही त्यांनी केली. सावंतवाडी टर्मिनसचे २४ जून २०१६ रोजी उद्घाटन झाले. काम पूर्ण होण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्णत्वास जाऊ शकले. मात्र, फेज २ हे सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम गेल्या ५-६ वर्षे बंदच आहे. मध्ये कोराना काळामुळे काम बंद राहणे समजून घेण्यास पात्र कारण आहे. पण आजतागायत हे काम बंदच राहिले आहे याची खंत सावंतवाडीकरांना भासत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास सावंतवाडीकरांचे मोठे स्वप्न पूर्ण होईल. स्व. समाजवादी नेते व माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचे शेवटचे स्वप्न पण पूर्ण होण्यास मदत होईल. यासोबतच सावंतवाडी स्टेशनवर रोजच्या ९ व आठवड्याला धावणा-या ४-५ अशाच रेल्वे गाड्या थांबतात. यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रवासी वर्गाला खूप मोठ्या गैरसोयीची अनुभूती होते. मुंबईला जायचे म्हटले तर सावंतवाडी स्टेशनवर ५-६ गाड्यांचेच पर्याय प्रवाशांना मिळतात. यातील अर्धे सिट हे रिझर्व कोट्यांकडे असल्यामुळे जनरल कोट्यांमध्ये तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. जवळच्या तालुक्यांतील स्टेशनवर किमान २५-३० गाड्या दिवसाला थांबवल्या जातात यामुळे तेथील नागरीकांची गैरसोय होत नाही पण सावंतवाडीतील नागरीकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते. सावंतवाडी तालुक्यातील रहिवाश्यांच्या सोयीसाठी हल्लीच जनशताब्दी सारख्या वेगवान रेल्वेलाही सावंतवाडी रेल्वेस्टेशनवर थांबा देण्यात आला होता. यामुळे प्रवाशांची गैरसोय थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती. पण आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व सावंतवाडीचा जोमाने होणारा विकास बघता आत्ताच्या काळात व आगामी काळात ज्यादा रेल्वेगाड्या नक्कीच उपयोगी ठरतील. कोकणातील विकास व कोकणी लोक यांच्यासाठी कोकणरेल्वेच एक सेतू आहे जो देशातील इतर बाबींशी जोडला जातो. गणेश चतुर्थी, जत्रा इ. सणांसाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. तरीही गर्दी ही रोज येण्या-या गाड्यांमध्येच असते. याचे कारण लोकांना मिळणारे पर्याय, त्यामुळे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास सावंतवाडीकरांची होणारी बरीच गैरसोय टळेल व सावंतवाडी टर्मिनसमुळे येथील जनतेला नक्कीच सगळ्या बाबतींमध्ये बराच फायदा होईल. आजतागायत कै. प्रा. मधु दंडवते, कै. जयानंद मठकर, जॉर्ज फर्नांडिस, बॅ. नाथ पै यांसारख्या दिग्गज नेत्यांनी तसेच आताच्या समाज सेवकांनी आपल्यासारख्या सावंतवाडी प्रेमी, मंत्री आमदार यांनी सावंतवाडी स्टेशन व टर्मिनस साठी बरच काही केले आहे. त्या लढ्यात आता हा लढा देखील सामील व्हावा व या लढ्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील अनंत जनता, कै. जयानंद मठकर साहेबांचे आशीर्वाद व आमच्यासारखे सावंतवाडीतील प्रेमी सगळेच तुमच्यासोबत मिळून हा सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न यशस्वीरित्या सोडवू अशी भावना जयानंद मठकर यांचे नातू तथा रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिहिर मठकर यांनी केली आहे. यावेळी रोट्रॅक्टचे प्रोजेक्ट चेअर सिद्धेश सावंत, विहंग गोठोसकर, पृथ्वीराज चव्हाण, मेहूल रेडीज,भावेश भिसे, प्रतिक नाईक आदी उपस्थित होते.