माणगाव महाविद्यालयाच्या वाडोस येथील निवासी शिबिरात व्याख्यान संपन्न.
सावंतवाडी: महाविद्यालयीन स्तरावर युवाईला श्रमसंस्कार, मूल्य संस्कार, व्यक्तीमत्व विकास, आपल्या जीवनाला विधायक दिशा प्रदान करणारे संस्कार अशा विविध संस्कारांची पेरणी करणारे सर्वोत्तम व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असून या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर अनेक युवक – युवती घडलेले आहेत. त्यामुळे निवासी श्रमसंस्कार शिबिराचा विद्यार्थ्यांनी भविष्यकालीन दृष्टिकोनातून विचार करून, श्रमसंस्कारांची शिदोरी आपल्या अंगी ठेवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी वाडोस (ता. कुडाळ) येथे आयोजित व्याख्यानादरम्यान केले.
माणगाव येथील माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, स्व. पार्वतीबाई महादेवराव धुरी कला, स्व. महादेवराव नारायणराव धुरी वाणिज्य व कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, माणगाव यांच्या राष्ट्रीय योजना विभाग आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर वाडोस येथे सुरू असून गुरुवारी ‘राष्ट्रीय सेवा योजना – युवा संस्काराचे सर्वोत्तम व्यासपीठ!’ या विषयावर प्रा. रूपेश पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पवार, वाडोस जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक – १ चे मुख्याध्यापक श्री. मधुकर शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ राजापूरकर, प्रा. सुजाता कदम आदी उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांचा विकास कसा घडतो, हे विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. प्रा. पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन स्तरावर युवकांना ग्रामीण भागातील संस्कार, तेथील चालीरीती व रूढी परंपरा आणि युवकांमध्ये श्रमाचे संस्कार बिंबवणारी खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे सुरू असलेली एकमेव योजना आहे. शासनाच्या अनेक योजना या केवळ कागदावर असतात. मात्र महाविद्यालयीन स्तरावर राबवली जाणारी एकमेव प्रामाणिक योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असून युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मौलिक भूमिका बजावणारी ही योजना आहे.
आपल्या व्याख्यानादरम्यान प्रा. रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम प्रेरणा गीते शिकवली. तसेच त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरांचा अनुभव देखील कथन करून विद्यार्थ्यांना अशा शिबिरांमधून कशा पद्धतीने स्वतःचा विकास घडविता येतो, हे सोदाहरण स्पष्ट केले.
या व्याख्यानप्रसंगी उपस्थित असलेले मुख्याध्यापक मधुकर शिंदे यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना शिबिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे सांगत ते आपल्या जीवनात कसे दिशा देते, हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका मेस्त्री या स्वयंसेविकेने केले तर आभार प्रदर्शन निमिषा खांबये हिने केले. यावेळी संस्कार शिबिरात सहभागी असलेले शिबिरार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.