मसुरे प्रतिनिधी: ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तिकेत २१ व्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेल्या शिक्षणाच्या दहा गाभाभूत घटकांवरील या मूल्यसंस्कार कथा विद्यार्थ्यांच्या जीवनात सहजगत्या बदल घडवून आणतील,” असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी येथे केले. मसुरे देऊळवाडा शाळेचे तंत्रस्नेही उपक्रमशील उप शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर यानी लिहिलेल्या ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तकाचे प्रकाशन कोमसाप मालवण, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण व शिक्षण विभाग पं.स. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा येथे करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सुरेश ठाकूर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, अशोक बागवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिताराम लाकम, सुगंधा गुरव, अरुण भोगले, हिर्लेकर गुरुजी, चंद्रशेखर धानजी, श्रृती गोगटे, सुरेंद्र सकपाळ, मनाली फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात ठाकूर पुढे म्हणाले, “आजच्या युगात मूल्ये हरवत चालली आहेत, असे म्हणतात. पण गुरुनाथ ताम्हणकर यांच्यासारखे शिक्षक जर प्रत्येक शाळेला लाभले आणि त्यांनी हे पुस्तकातील मूल्यसंस्कार कथनाच्या माध्यमातून विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविले तर पुढील पिढ्या निश्चितच संस्कारक्षम होतील.”
या पुस्तिकेच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन हिर्लेकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक लेखक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. त्यांनी कोमसाप मालवणच्या साहित्यिक मार्गदर्शनाचे तसेच जिल्हा शिक्षण संस्था, शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांचे विशेष आभार मानले. सुरेंद्र सकपाळ, सुगंधा गुरव, नारायण देशमुख, अरुण भोगले, अशोक बागवे यांनी आपले विचार मांडले. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, शर्वरी शिवराज सावंत, प्रशांत पारकर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले.
सदर पुस्तकाला यशश्री ताम्हणकर हिचे बालसुलभ मुखपृष्ठ लाभले असून तेजल ताम्हणकर यांनी पुस्तकाचे नेटके संपादन केले आहे. प्रस्तावना शिवराज सावंत यांची लाभली असून पुस्तकाचे प्रकाशन सत्त्वश्री प्रकाशन रत्नागिरी यांनी केले आहे. यावेळी पालक, ग्रामस्थ, केंद्रातील शिक्षक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. तेजल ताम्हणकर व आभार सौ. कविता सापळे यांनी मानले.