१३ जून वार्ता: एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या करून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमधून स्वतः पोलिस ठाण्यात नेला. तिने पोलिसांसमोर तिच्या गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी 39 वर्षीय महिलेविरुद्ध तिच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरूमधील एका अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सेनाली सेन असे या आरोपी महिलेचे नाव असून ती, पती, सासू आणि तिच्या आईसह बंगळुरूमधील एनएसआर ग्रीन अपार्टमेंटमध्ये एकाच घरात राहत होते. हे प्रकरण मायको लेआऊट पोलिस ठाण्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय महिला अचानक सुटकेस घेऊन मायको लेआउट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली.
पोलिसांनी तिला काही विचारण्याआधीच ती स्वतःच बोलू लागली. तिने सांगितले की ती फिजिओथेरपिस्ट आहे. तिच्यात आणि आईमध्ये वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे वैतागून तिने तिच्या आईची हत्या केली. मात्र तिला पळून जायचे नव्हते , त्यामुळेच तिने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून पोलीस ठाण्यात आणला.ही महिला मूळची पश्चिम बंगालची आहे. सध्या ती बंगळुरू येथे पती, सासू आणि आईसोबत राहते. ही रक्तरंजित घटना घडली तेव्हा पती घरी नव्हता. तसेच महिलेची सासू दुसऱ्या खोलीत असल्याने त्यांनाही या कृत्याचा थांगपत्ता लागला नाही. सध्या पोलिसांनी आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक केली आहे. तिची कसून चौकशी सुरू आहे.