मसुरे प्रतिनिधी: अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम प्रभूंच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवालयात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री रामलल्लाच्या प्रतिमेचे पूजन देवस्थान उपाध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते झाले. त्या नंतर महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले. अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण रामभक्तांना दाखविण्यात आले. आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. यावेळी आई भगवती माता की जय, जय श्री राम, प्रभु रामचंद्र की जयचा जयघोष श्रीराम भक्तांनी केला.कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातून कारसेवक म्हणून भूमिका बजावलेल्या कै. अरुण सावंत, कै. धाकु लब्दे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि प्रमोद सावंत, सुनील सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
सायंकाळी स्थानिक भजन, दीपोत्सव, रात्री कीर्तनकार अमित सावंत यांचे कीर्तन आयोजित केले आहे. यावेळी देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.