मसुरे प्रतिनिधी: भारतीय संविधानाच्या निर्मितीने या देशाला एक अद्वितीय ओळख देणाऱ्या कोट्यावधी शोषितांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या आणि प्रज्ञा, शील व करुणेचा महासागर असलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मुणगे आडबंदर कारीवणे पोलीस पाटील श्री तुषार आडकर आणि ग्रा सदस्य सौ.रवीना मालाडकर आणि श्री संतोष बांदेकर यांच्या सौजन्याने कातकरी वस्तीतील ग्रामस्थांना ब्लॅंकेट, साखर वाटप आणि तेथील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील तुषार आडकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व लहान मुलांना पटवून देत शिक्षणात कितीही कठीण प्रसंग आला तरी शिक्षण घेत शिका संघटित व्हा आणि तुमच्या जीवनाचा उत्कर्ष करा असे मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षण घेण्यात कधीही अडचण आल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असेही सांगितले. सर्व ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाबाबत पोलीस पाटील तुषार आडकर व ग्रा सदस्या रवीना मालाडकर तसेच संतोष बांदेकर यांचे आभार मानले.







