मुंबई: येथे २८ मे ते ११ जून या कालावधीत कठोर निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्यांची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा काही घटना घडवण्याची शक्यता गुप्तहेरांकडून मिळाली असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आदेश दिले आहेत. विवाह सोहळा, शोकसमारंभ, सोसायट्या-संस्था यांचे कार्यक्रम, चित्रपटगृह-नाट्यगृह, दुकाने, व्यवसायाची ठिकाणे यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
या आदेशानुसार ५ किंवा त्याहून अधिक व्यक्ती अवैधरित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावेत, असे पोलिसांच्या आदेशात म्हटले आहे. ११ जूनपर्यंत शहरात हा आदेश लागू राहील. शहरातील शांतता टिकून रहावी, मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या हेतूने हा आदेश काढण्यात आला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.