१७ जुलै, वार्ता: आम्ही दिलेला शब्द पाळल्याने व हिंगोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा असल्याने त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री न्याय करतील अशी आम्हाला आशा आहे असे सांगताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा मंत्रिपदावर दावा केला आहे. आमदार बांगर म्हणाले की, आगामी काळात म्हणजे या दोन- चार दिवसांनी किंवा सभागृह सुरू झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.
अजित पवार गटाच्या आगमनाने शिंदे गटातील आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, मात्र आता लवकरच राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिंदे गटातील अनेक आमदार आपल्याला संधी मिळणार असल्याचा दावा करत आहेत. त्यातच आता आम्हाला मंत्रिपद मिळणार असल्याचे बांगर यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना आमदार बांगर म्हणाले, “आम्ही आजही सांगत आहोत की, ज्या प्रकारे आम्हाला आश्वासन दिले होते, ते आश्वासन पूर्ण केले जाईल.” ते पुढे म्हणाले की, शिवसेना हा आदेश पाळणारा पक्ष आहे. शिवसेना खासदार हेमंत पाटील आणि आम्ही शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात यावे, अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना करणार असल्याचे ते म्हणाले.
या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झोपतात की काय? असा प्रश्न अनेकांना पडला असल्याचे बांगर म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करताना बांगर म्हणाले की, आजपर्यंत १८ तास काम करणारा मुख्यमंत्री झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही.