मालवण: येथील सागरी जल पर्यटनाची मुदत २५ मे पर्यंत असून २६ मे पासून प्रवासी जल वाहतुकीबरोबरच विविध जलक्रीडा पावसाळी हंगामासाठी बंद राहणार आहेत. मात्र सध्या मालवणच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा म्हणजेच मे महिना सुरु असून मे महिन्याच्या मध्यानंतरच पर्यटकांचा ओघ मालवणात वाढत असल्याने २५ मे नंतर प्रवासी जलवाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीस ३१ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी मेरीटाइम बोर्डासह आमदार वैभव नाईक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेरीटाईम बोर्डाच्या नियमावली नुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रात होणारी जलवाहतूक व जलक्रीडा यांना दरवर्षी २५ मे पर्यंतच मुदत देऊन २६ मे पासून बंदी करण्यात येते. मालवणातील पर्यटन व्यवसायात सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व जलक्रीडा हे महत्वाचे घटक असून त्यांनाही हा नियम लागू होतो मात्र पर्यटकांचा ओघ व हवामानाचा अंदाज घेऊन यापूर्वी काहीवेळा मेरिटाईम बोर्ड व स्थानिक बंदर विभाग यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीस मुदतवाढ देण्यात आली होती. तर गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तारकर्ली येथे स्कुबा डायविंगची बोट उलटून दुर्घटना घडल्याने मेरिटईम बोर्डाने सरसकट सर्व प्रवासी जलवाहतूक व जलक्रीडा बंद करून मुदतवाढही नाकारल्याने त्याचा मोठा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर झाला होता.