मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रानभाज्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, लागवड वाढून ते उत्पन्नाचे साधन बनावे तसेच लोकांच्या आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश वाढवावा या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय आनंदव्हाळ येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळून येणाऱ्या विविध रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तसेच या रानभाज्यांपासून बनलेल्या पाककृतींसाठी स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कृषी अधिकारी तसेच रानभाजी अभ्यासकांचे मार्गदर्शन देखील शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. यावेळी पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या रानभाजी महोत्सवामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मालवण श्री अमोल करंदीकर यांनी केले आहे.







