मसुरे प्रतिनिधी:
प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मालवण केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा मालवण दांडी शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ.निर्झरा नरेश जोशी यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे अप्पे” या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मालवण केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी व स्वयंपाकी,मदतनीस यांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध धान्यांचा वापर करुन पिझ्झा,मोदक,नाचणीचे घावणे,थालीपीठ,अप्पे,धपाटे,इडली,मिलेट रोल अंबिल,नाचणी हलवा,असे अनेक पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह मांडणी केली होती.
या स्पर्धेत जि.प प्राथमिक धुरीवाडा मालवण शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ.काव्या किरण खडपकर यांनी बनविलेल्या ‘इडली’ या पाककृतीनेही द्वितीय क्रमांक पटकावला तर टोपिवाला हायस्कुलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ.आनंदी रघुनाथ घोगळे यांंनी बनविलेल्या धपाटे या पाककृतीस तृतीय क्रमांक मिळाला.
केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. याला अनुसरूनच पालक व नागरिक यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे परीक्षण सौ.पूनम नागेश चव्हाण व सौ.प्रिया शैलेश पावसकर यांनी केले. आरोग्य विषयक लाभ,पौष्टिकता,चव,कृती,मांडणी, इंधन बचत या मुद्द्यांआधारे परीक्षण करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन मालवण गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी श्री.उदय दीक्षित,श्री.शिवराज सावंत यांच्या शुभहस्ते झाले यावेळी सौ.विणा गोसावी,श्री.रेनाँल्ड बुतेलो सौ.सायली ढोलम,सौ.श्वेता यादव,परीक्षक सौ.पूनम चव्हाण,सौ.प्रिया पावसकर व स्पर्धक उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षिस वितरण गटविकास अधिकारी श्री.आप्पासाहेब गुजर ,यांच्या शुभहस्ते झाले.तालुकास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त दांडी शाळेची स्वयंपाकी सौ.निर्झरा जोशी हीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.