मालवण: येथे ४ डिसेंबर या दिवशी होणार्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधीची खिरापत वाटली जात आहे. हा निधी लाटण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत. त्यांना शासनकर्त्यांचे पाठबळ आहे. मालवण शहरात होणार्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर केला जाणारा भ्रष्टाचार पचवू दिला जाणार नाही. भ्रष्टाचार केलेल्या विकासकामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली जाईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी खासदार राऊत म्हणाले, ‘‘नौसेना दिन येथे होणे ही सिंधुदुर्गवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे; मात्र नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. ज्या रस्त्यांच्या कामांचे डांबरीकरण होत आहे, ते रस्ते उखडले गेले आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला रंग काढण्यात आला आहे. तो रंग म्हणजे खर्या अर्थाने चुना लावण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे या सर्व भ्रष्टाचारांच्या कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी नोंद घेऊन त्याविषयी राज्यशासनाला आदेश देतील, अशी मला अपेक्षा आहे. नौसेना दिनाच्या कालावधीत किनारपट्टीवरील मासेमारी काही दिवसांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे मासेमारांची हानी होणार आहे. त्यामुळे केरळ, तमिळनाडू या राज्यांच्या धर्तीवर नोंदणीकृत नौकांच्या मालकांना रोख स्वरूपात हानीभरपाई देण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.’’
Home स्टोरी मालवणमध्ये नौसेना दिनाच्या निमित्ताने होणार्या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार! खासदार विनायक राऊत