Home स्टोरी मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जीवंत मूर्ती होय…! सद्गुरू श्री वामनराव...

मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जीवंत मूर्ती होय…! सद्गुरू श्री वामनराव पै.

319

संपादकीय: श्री वामनराव पै एक महान समाजसुधारक, एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेता आणि नाविन्यपूर्ण जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक होते. ते एक स्व-प्रेरित व्यक्ती होते. प्रत्येक मानवाला आनंदी बनवायचे हा त्यांचा निःस्वार्थ प्रयत्नाचा एकमेव उद्देश होता. यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलं. या पुस्तकातून त्यांनी मानवाला आनंदी जीवन  जगता यावे यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. या पुस्तकांचा अभ्यास करून आज अनेक व्यक्ती चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. तसेच अनेक व्यक्ती उत्कृष्ट पदावर कार्यरत आहेत. श्री वामनराव पै लिखित असेच एक मानवासाठी अगदी महत्वपूर्ण असे पुस्तक म्हणजे “शरीर साक्षात परमेश्वर सैतान सुद्धा” हे होय.  श्री वामनराव पै यांनी लिहिलेली सर्व पुस्तके ही मानव जातीसाठी वरदानच आहेत. त्यातीलच एक पुस्तक “शरीर साक्षात परमेश्वर सैतान सुद्धा”  आजच्या युगात भरकट चाललेल्या, वेसनाच्या अधीन झालेल्या आणि शरीराची काळजी न घेता शरीराची वाट लावणाऱ्या  तरुण-तरुणींचे जीवन बदलणारं आणि निश्चितच यशाच्या मार्गावर नेणारं आहे.

“शरीर साक्षात परमेश्वर सैतान सुद्धा”  पुस्तकाच्या माध्यमातून श्री वामनराव पै सांगतात की, मानवी शरीर हे अत्यंत अलौकिक, विस्मयकारक व विलक्षण असून सुद्धा मानव जातीला या शरीराचे महत्त्व योग्य प्रकारे उमजलेले दिसत नाही. जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून शरीर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. विश्वापासून ते विश्वंभरापर्यंत स्थूल मानाने एक साखळी आहे, ती खालील प्रमाणे सांगता येईल –

विश्व – राष्ट्र – समाज – कुटुंब – इंद्रिये

                     शरीर

बहिर्मन-अंतर्मन-जीव-ईश्वर-परमेश्वर

वरील साखळी जर आपण पाहिली तर आपल्याला असे दिसून येईल की, शरीराचे स्थान केंद्रस्थानी आहे. हे शरीर अलिकडच्या बाजूने व्यक्ताशी जोडले गेलेले आहे, तर पलीकडच्या बाजूने ते व्यक्ताशी जोडले गेलेले आहे, म्हणून शरीराची योग्य पद्धतीने उपासना व जोपासना केली तर व्यक्त व अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची उपासना व जोपासना केल्याचे श्रेय प्राप्त होईल. याच्या उलट शरीराची प्रतारणा व अवहेलना केल्याने व्यक्त व अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची प्रतारणा व अवहेलना केल्याचा दोष पदरात पडेल. खरे सांगायचे म्हणजे मानवी शरीराचे यथार्थ वर्णन व कौतुक विशद करण्यास शब्दच अपुरे पडतात. मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जीवंत मूर्ती होय. वास्तविक, परमेश्वराच्या या जीवंत मूर्तीची पूजा करणे हेच मुळात अभिप्रेत आहे. आपल्या साधुसंतांनी व ऋषिमुनींनी आपल्याला पाषाणाची मूर्तिपूजा करायला शिकविली, त्यात त्यांचा मूळ हेतू लोकांनी ‘मानवी शरीर’ या परमेश्वराच्या जीवंत मूर्तीकडे वळावं असाच होता. तुम्ही कुठल्याही मूर्तीकडे प्रथम पहा व नंतर तुम्ही स्वतःकडे पहा. मग तुम्हाला असे लक्षात येईल की, ती पाषाणाची मूर्ती हुबेहूब थोड्याफार फरकाने मानवी शरीरासारखीच आहे. थोडक्यात, माणसाने माणसाची मूर्ती तयार केली व ती ‘देवाची मूर्ती’ असे जाहीर केले. आता ही मूर्तिपूजा लोकांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की, ते माणसाने निर्माण केलेल्या पाषाणाच्या अचेतन मूर्तीकडे प्रत्यक्ष देवच म्हणून पाहू लागले व परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवी शरीररूपी जीवंत परमेश्वराच्या मूर्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून राहिले. त्याचप्रमाणे तथाकथित परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या आहारी जाऊन बहुतेक माणसे कर्मकांडांत स्वतःला गुंतवून घेतात व सर्व आयुष्य वाया घालवितात.

त्याचप्रमाणे अज्ञान व अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊन बहुतेक लोक शरीराकडे शत्रू म्हणून पाहतात, उद्योग-धंद्याकडे दुर्लक्ष करतात, संसार सोडतात, जगाकडे तुच्छतेने पाहतात व तथाकथित वैराग्य धारण करतात. अशा लोकांना “घड ना परमार्थ, धड ना संसार। तुका दोहीकडे चोर” अशी अवस्था प्राप्त होते. जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही. जीवनविद्या सांगते पाषाणाच्या मूर्तीची पूजा व इतर कर्मकांड करण्यापेक्षा मानवी शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीची पूजा करणे व कर्म चांग करणे अनंतपटीने श्रेष्ठ होय.

आता या शरीररूपी परमेश्वराची पूजा करायची म्हणजे नेमके काय करायचे ते आपण थोडक्यात पहाण्याचा प्रयत्न करू. शरीराची स्वच्छता राखणे व त्याची योग्य ती काळजी घेणे, शरीराला उत्तम सवयी लावणे व त्याचे उत्कृष्ट पद्धतीने संगोपन करणे, त्याला उत्तम शिक्षण, शिकवण व संस्कार देणे, व्यायाम व योगासने यांच्या द्वारे शरीराला सुस्थितीत व कार्यक्षम ठेवणे, त्याला उत्तम खायला व उत्तम प्यायला देणे म्हणजेच शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीची पूजा करणे होय. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराची पूजा करण्याऐवजी त्याची विटंबना करीत असतात. स्नान न करणे, त्याला ओंगळ स्थितीमध्ये ठेवणे, त्याला घाणेरड्या अनिष्ट सवयी लावणे, दारू, गुटखा, गांजा, गर्द, तंबाखू, विडी, सिगारेट वगैरे घाणेरड्या गोष्टींच्या व्यसनांचा नैवेद्य अर्पण करणे, शिक्षण न देणे, अंधश्रद्धेची शिकवण देणे, अनिष्ट संस्कार करणे, अशा प्रकारे बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीची विटंबना व अपमान करीत असतात.
‘जशी क्रिया तशी प्रतिक्रिया’ या निसर्गनियमाप्रमाणे शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तिला अनिष्ट गोष्टींच्या विषाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे निसर्गदेवतेचा भयंकर कोप होतो व या लोकांना शारीरिक व मानसिक रोग होऊन व अनेक आपत्ती-विपत्तींना तोंड द्यावे लागून त्यांचे जीवन व त्यांचा संसार उध्वस्त होतो. याच्या उलट वर म्हटल्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक शरीराचे उत्तम संगोपन व संवर्धन केल्याने व त्याला उत्तम, उत्कृष्ट व चांगल्या अशा गोष्टींच्या अमृताचा नैवेद्य अर्पण केल्याने निसर्गदेवतेची अशा लोकांवर कृपा होते आणि त्यांना शारीरिक व मानसिक सुस्थिती व आरोग्य प्राप्त होऊन त्यांचे जीवन सर्वांगाने व सर्वार्थाने सुखी, यशस्वी व समृद्ध होते. थोडक्यात, शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीला उत्कृष्ट नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचे की त्याला अनिष्ट गोष्टींचा नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचे हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते. “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”

मानवी जीवनाला योग्य वळण देण्यासाठी आणि शरीराला समजून घेण्यासाठी “शरीर साक्षात परमेश्वर सैतान सुद्धा”  हे पुस्तक नक्की वाचा.