कुडाळ (माणगावं): माणगावं गावातील कलेली ते तळीगावं परिसरातील कूपर कॉलनीकडून येथे जाणारा रस्ता गेल्या ८ महिन्याभरापासून खचला असून या रस्त्याकडे अद्याप पालिक प्रशासनाने ढूंकूनही पाहिलेले नाही. एवढेच नव्हेतर हा रस्ता जिथे खचला आहे, त्याच्या सभोवती बॅरिकेटिंग लावण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात पावसाने हळूहळू जोर धरला आहे. त्यामुळे कलेली ते तळीगावं परिसरातील मुख्य रस्ता महिन्यापूर्वी काही फूट खचला आहे.
मात्र, रस्ता दुरुस्त करायचे सोडाच, पण संबंधित परिसरात बॅरिकेटिंग लावून सावधगिरीच्या सूचना करण्याचीही तसदी जिल्हा तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली नाही. रस्ता खचल्यामुळे याठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरुन प्रवास करतांना प्रसंगी जिवीतहानी होण्याची भीतीही आहेच. मात्र तरीही प्रशासन सुस्त अजगराच्या भूमिकेत असून कदाचित एखाद्या अपघाताची वाट बघत असावे, असे दिसून येत आहे.
सध्या सुरु असलेला पाऊस असाच सुरु राहिला तर हा रस्ता वाहून जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता वाहून गेल्यास परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार, हे ओघाने आलेच. मात्र प्रशासनाने जर वेळीच या रस्त्याकडे लक्ष न दिल्यास घडणाऱ्या अपघातास व त्यातून होणाऱ्या जिवीत वा वित्तहानीस केवळ प्रशासन जबाबदार राहणार, हे मात्र नक्की.