Home स्टोरी माणगांव (तालुका कुडाळ) येथे २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

माणगांव (तालुका कुडाळ) येथे २१ फेब्रुवारीला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन

153

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

 

कुडाळ (सिंधुदुर्ग): मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरांतील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा हा मंदिराचे व्यवस्थापन, मंदिर संस्कृतीचे जतन आणि सबंर्धन, पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरातील धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. हे थांबले पाहिजे तसेच मंदिर विश्वस्त, पुजारी यांचे संघटन, त्यांच्या समस्या सोडविणे तसेच सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देणे अशा विविध विषयाच्या अनुषगांने हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री दत्तमंदिर न्यास, माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२१ फेब्रुवारी २०२४ यादिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिर येथे महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदु जनजागृती समिती तथा ‘मंदिर महासंघा’ चे समन्वयक श्री. सुनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, माणगांव दत्त मंदिर व्यवस्थापक श्री. शिवराम काणेकर, वेतोबा मंदिर आरवलीचे अध्यक्ष श्री. जयवंत बाबुराव राय, श्री पावणाई रवळनाथ मंदिर कसालचे मुख्य मानकरी श्री. यशवंत बळीराम परब , पुरातन श्री साई मंदिर कुडाळचे विश्वस्त श्री. राजन श्रीपाद माडये, हिंदू जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या अधिवेशनाला मुख्यत्वे माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, विरार (मुंबई) येथील जीवदानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री ) स्वाती खाडये, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ता आणि अभ्यासक आदी ३०० हून अधिकजण सहभागी होणार आहेत. या मंदिर अधिवेशनात मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, मंदिरांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी न्यायालयीन लढा, वक्फ बोर्डच्या माध्यमातून मठ मंदिरांच्या बळकावलेल्या जमिनी याविरोधातील संघर्ष, कुळकायदा, ‘मंदिरांचे पावित्र्य टिकवणे’, ‘मंदिरांतील सुव्यवस्थापनातून आणि उत्पन्न सरकारी योजनांचा लाभ’, ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता आणि भावीदिशा’, ‘प्रशासन आणि मंदिर विकास यांच्यातील अडचणी’, ‘मंदिरांच्या यशस्वीतेसाठी धर्माधिष्ठीत कार्य करावे’, यांविषयी चर्चा होणार आहे.

 

जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. तसेच दुसरी राज्य स्तरीय परिषद ओझर अष्टविनायक येथे घेण्यात आली. त्यानंतर गोवा आणि कर्नाटक राज्यातही मंदिर महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय मंदिर अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यााला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंदिर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ वर्षभरामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सुरू झाले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात केवळ ६ महिन्यांत ४१५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. अशी माहिती श्री घनवट यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी सद्गुरू सत्यवान कदम यांनी मंदिरांचे पावित्र्य राखणे किती गरजेचे आहे याबाबत माहिती दिली.पत्रकार परिषदेत बोलताना श्री वेतोबा मंदिर आरवली चे अध्यक्ष श्री. जयवंत राय म्हणाले की सिंधुदुर्ग मध्ये मंदिर परिषदेचे आयोजन होत आहे ही एक अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. वाराणसी व ओझर येथे झालेल्या परिषदेला आमच्या मंदिराकडून एक प्रतिनिधी पाठवण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमातून सुंदर माहिती उपलब्ध झाली. आपली हिंदू संस्कृती परंपरा जपली जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी हे कार्य मोलाचे व आनंददायी आहे. ओझर येथील परिषदेत तेथील देवतेच्या सानिध्यात सिंधुदुर्गातून गेलेल्या प्रतिनिधींनी जिल्ह्यात मंदिर परिषद घेण्याचा संकल्प केला होता. त्याचा परिणाम म्हणून या परिषदेचे आयोजन होत आहे, असे श्री. राय यांनी सांगितले. सुमारे दोन तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकार यांनी मंदिरांच्या स्थानिक भागातील समस्या व त्यांची सोडवणूक तसेच ईतर अनेक विषयांबाबत मुक्तपणे संवाद साधला. यावेळी श्री घनवट यांनीही या संवादात्मक प्रश्नांची समर्पक उत्तरे देत मंदिर रक्षणात पत्रकारांचे सहभाग व योगदान तेवढेच महत्त्वाचे असून याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले.हे मंदिर अधिवेशन महासंघ परिषद केवळ निमंत्रित मंदिर विश्वस्त, पुरोहित, तसेच मंदिर क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी आहे त्यामुळे अन्य मंदिर विश्वस्त, पुरोहित यांना सहभागी व्हायचे असल्यास ७०५७०६४६०२ याक्रमांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ कडून करण्यात आले आहे.