Home स्टोरी माडखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात भ्रष्टाचार?

माडखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात भ्रष्टाचार?

210

सावंतवाडी: तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाच्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्याने ग्रामस्थांना सोबत घेऊन धरणाची पाहणी करावी आणी त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे सत्यात तपासून चौकशी करून अहवाल सादर करावा, त्या नंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे निर्देश शालेय शिक्षण दीपक केसरकर यांनी दिले.

 

माडखोल लघुपाटबंधारे धरणासाठी पाईप खरेदी आणि कालव्याच्या कामात भष्टाचार झाला याविषयीं ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. यासाठी मागील दोन मासापूर्वी ते उपोषणास बसले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्यांनी त्यांची भेट घेऊन बैठकीचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली या विषयी बैठक झाली.

 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सूर्यकांत राऊळ, राजकुमार राऊळ, पांडुरंग राऊळ तसेच सरपंच राऊळ आणी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजकुमार राऊळ व सूर्यकांत राऊळ यांनी माडखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे शेती बागायतीला पाणी मिळत नसल्याने सांगितले.

 

लघुपाटबंधाऱ्याचे पुढील काम करण्यासाठी मे महिन्यामध्ये सव्वा कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, याविषयी निविदा काढण्यात आली आहे. हे काम सुरु करताना अधिकारी व ग्रामस्थ यांची समिती नेमण्यात यावी. या समितीने कामावर लक्ष ठेवून येत्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल हे पहावे. तसेच या धरणातून पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी, असे निर्देश केसरकर यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.