३१ मे वार्ता: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी २१ एप्रिलला ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने रविवार दि. २३ एप्रिल पासून आघाडीचे कुस्तीगीर पुन्हा जंतरमंतर मैदानावर आंदोलन बसले होते. पण, दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यांचे तंबूही काढून टाकले. यानंतर देशभरात संतापाची लाट उमटली.
अजूनपर्यंत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक झालेली नाही. याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. पण, सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर एफआयआर आणि आरोपांची चौकशी सुरू झाली आहे. पोलीस दोन आठवड्यात अहवाल दाखल करू शकतात. पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, मोठ्या संख्येने लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अनेक साक्षीदारांचेही जबाब नोंदवले जात आहेत. पण, अद्याप कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे ब्रिजभूषण यांना अटक झालेली नाही.
आजही ब्रिजभूषण यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला, तर मी स्वत: फाशी घेईन. जर तुमच्याकडे (कुस्तीपटूंकडे) काही पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा. मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे,” असे ब्रिजभूषण यांचे म्हणणे आहे.