मालवण प्रतिनिधी: सोळाव्या शतकात एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५८ पर्यंत भारतात राज्य केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी राजवटीविरोधात १८५७ मध्ये भारतीयांनी केलेला उठाव ब्रिटिशांनी मोडीत काढल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट वर्षभरानंतर संपुष्टात येऊन ती ब्रिटिश राणीकडे भारताची सत्ता सोपविण्यात आली. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारतातील जुलमी ब्रिटिशांच्या राजवटीचा मागोवा घेत असताना त्या काळात आपली मुले शिकली पाहिजेत, सवरली पाहिजेत या हेतूने खेड्यापाड्यात ग्रामस्थांच्या सहयोगातून ज्या मोजक्याच शाळा उभ्या राहिल्या त्यातील एक शाळा म्हणजे मालवण तालुक्यातील वेरली गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरली ही होय. आज ही शाळा शतकोत्तर हिरक महोत्सव साजरा करीत आहे हे कुणालाही सांगूनही खरे वाटणार नाही परंतु मालवण पासून वीस- बावीस की. मी. अंतरावर असणाऱ्या वेरली या छोटेखानी गावात स्वातंत्रपूर्व काळात किंबहुना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत १८ नोव्हेंबर १८५६ रोजी वेरली गावच्या बुजूर्गानी ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या प्रांगणात होय. प्रांगणातच विद्येचे ज्ञान मंदिर उभारले. सरस्वती रुपी श्री देवी सातेरीचा कृपाशिर्वाद पाठीशी आहे ही प्रबळ आशावाद बाळगत सुरु केलेल्या या ज्ञान मंदिराला आज १६६ वर्षे पूर्ण होत आहेत.
दिवसामागून दिवस लोटले, वर्षामागून वर्षे लोटली स्वातंत्र्योत्तर काळात श्री देवी सातेरीच्या प्रांगणातील या ज्ञान मंदिराचे स्थलांतर अर्धा फर्लांगावर असणाऱ्या गावातील स्वर्गीय सीताराम कृष्णाजी परब यांच्या जमिनीवर आजही दिमाखात उभे आहे आणि त्या ज्ञान मंदिरातील चिमुकल्यांच्या मुखातून स्वररुपी गुंज ऐकू येतेय.
शब्द रुपी शक्ती दे….. भाव रुपी भक्ती दे…. प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा…. चिमणपाखरा….. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा! मालवण पासून बावीस किलोमीटर अंतरावर असणारे वाडी वजा गाव म्हणजे वेरली गाव होय! निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी या गावातील लोक कामाच्या निमित्ताने मुंबई सारख्या महानगरीत गेले आणि या महानगरीने त्यांना सामावून घेतानाच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला.
या गावातील लोक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. एवढेच कशाला, या गावातील लोक भारत मातेचे रक्षण करणारे सैनिक म्हणूनही परिचित आहेत. स्वातंत्रपूर्व काळात वेरली गावचे योगदानही आहे. मात्र, त्याविषयी इतिहास गप्प आहे पण एक गोष्ट खरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी राजवटीतही शिक्षणाने माणूस समृद्ध बनतो हा विचार घेऊन काम करणारी मंडळी वेरली या गावात होती म्हणूनच १८ नोव्हेंबर १८५६ रोजी पहिले ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणजेच शाळा ती सुद्धा सरस्वती रुपी श्री देवी सातेरीच्या प्रांगणात ज्ञान मंदिर उभे केले. या गावातील लोकांच्या या धाडसाला… त्यांच्या या कर्तुत्वाला एकवीसव्या शतकाकडे आपण वाटचाल करताना सलाम हा ठोकलाच पाहिजे.खरतर सातेरी मंदिरा नजिकच सुरु झालेली ही मातीच्या भिंतींची शाळा म्हणजे एक भला मोठा हॉल होता त्याचे छप्पर नळ्यांचे होते. एका हॉलमध्ये म्हणजेच मोठ्या खोलीत चार वर्ग भरायचे. या शाळेचा लाभ वेरली गावच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांतील मुले घ्यायची हे कित्येक वर्ष सुरु होते. दरम्यानच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले.
सातेरीच्या प्रांगणात भरणारी ही शाळाही मोडकळीस आली होती. अशावेळी वेरली गावातील आपा गावकर, सीताराम उर्फ आना कृष्णाजी परब, दाजी लाड (वाणी) आणि धाकू भिवा परब या मंडळींनी व ग्रामस्थांनी शाळा मोडकळीस आल्याने नवीन इमारत बनविण्याचे ठरविले. सीताराम उर्फ आना परब यांनी गावातील आपली जमीन शाळा बांधण्यासाठी दिली. जमीन तर मिळाली शाळा आता बांधलीच पाहिजे या हेतूने सीताराम परब, आपा गावकर, दाजी वाणी, धाकू परब यांनी गावात शाळा बांधण्यासाठी म्हणून मदत फेरी काढली. गावातील लोकांनीही हरतऱ्हेची मदत केली. कोणी इमारतीच्या लागणाऱ्या लाकडासाठी झाडे दिली, कुणी छप्परासाठी कौले दिली, कुणी पैसा अडका दिला आणि लोकांच्या श्रमदानातून चार भिंतीची देखणी शाळा उभी राहिली. सातेरी मंदिराजवळ भरणाऱ्या शाळेच्या छपाराचे नळे मुलांच्या अंगावर पडण्याची भीती लक्षात घेऊन शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सहदेव धामापूरकर आणि त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी शाळा ग्रामस्थांनी बांधलेल्या नवीन इमारतीत हलवली मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या या कृतीला आक्षेप घेतला व नोटीसा बजावल्या. यावेळी धामापूरकर गुरुजी आणि इतर शिक्षकांच्या पाठीशी ग्रामस्थ ठाम उभे राहिले. शासनाला नमते घ्यावे लागले शासनाने नवीन इमारतीत शाळा भरविण्यास मान्यता दिली. तर सीताराम कृष्णाजी परब या ग्रामस्थांनी आपली शाळेची जमीन शासनाला बक्षीस पत्राने दिली अशी माहिती गावचे वयोवृद्ध ग्रामस्थ व माजी विद्यार्थी बाळा मेस्त्री यांनी दिली. श्री. बाळा मेस्त्री यांनी पूढे सांगितले, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सीताराम परब यांच्या जागेत ही इमारत बांधण्यात आली होती. ग्रामस्थांनी बांधलेल्या या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरायचे. वेरली गावच्या आजूबाजूचे ग्रामस्थ भल्या पहाटे हातात कंदील घेऊन आपल्या मुलांना शाळेत घेऊन यायचे. शाळेत मुले आवडीने शिकायची आज या शाळेत आठवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते आज या शाळेला लागून शिक्षक स्टाफ साठी इमारत, संगणक कक्षाची इमारत, पोषण आहाराची इमारत अशा इमारती बांधण्यात आल्या आहेत.वेरली गावातील ही शाळा एक आनंददायी शिक्षण देणारी शाळा म्हणून या शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेत शाळा पूर्व तयारी अभियान नवागतांचे स्वागत, मोफत गणवेश वितरण, वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता अभियान, कुंडी वाटप स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम, परिपाठ, पाककला स्पर्धा, राष्ट्रीय पोषण आहार, योगासने प्रात्यक्षिके, महाराष्ट्राची लोकधारा, भरारी विद्यार्थी हस्त लिखित, आमची परसबाग, बांदावरची शाळा, विध्यार्थ्यांचा दशावतार, लोकसहभागातून शाळेसाठी झोपाळा घसरगुंडी, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, लोकसहभागातून बाळगोपाळ पंगत, साने गुरुजी कथामाला, संगणक साक्षरता वर्ग, रांगोळी स्पर्धा, सावित्रीबाई फुले जयंती, मराठी भाषा गौरव दिन, विविध क्रीडा स्पर्धा, महिला दिन, रांगोळी मार्गदर्शन वर्ग, कार्यानुभव प्रात्यक्षिक वर्ग, विज्ञान विविध प्रयोग आदी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक व सहशालेय उपक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा रेडकर, पदवीधर शिक्षक राजेंद्र धारपवार, उपशिक्षक उदय कदम, सौ पूर्वा केळूसकर हा शिक्षक वर्ग करीत आहे.या शाळेचा शतकोत्तर हिरक महोत्सव साजरा करण्याचे ग्रामस्थांनी ज्यावेळी ठरविले त्यावेळी मुख्याध्यापिका सौ. शुभदा रेडकर आणि त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी तसेच शतकोत्तर हिरक महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय परब, उपाध्यक्ष आबा परब, सेक्रेटरी सुरेश मापारी,शाळा समितीचे अध्यक्ष गौतम तांबे, सरपंच धनंजय परब, उपसरपंच दिनेश परब तसेच ग्रामपंचायत वेरली, शाळा व्यवस्थापन समिती, शतकोत्तर हिरक महोत्सव समिती, आजी माजी विध्यार्थी, पालक व ग्रामस्थानी हिरहिरीने भाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना विकसित करतानाच या देशाची भावी पिढी सुजाण आणि सुसंस्कृत बनावी म्हणून या शाळेचे शिक्षक पालक ग्रामस्थ जे प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. विध्यार्थ्यांचा विकास साधणाऱ्या या शाळेने द्विशतक पूर्ण करावे आणि ते करताना वेरली गावचा शैक्षणिक दर्जा उंचावतानाच गावचा नावलौकिक वाढवावा यासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रफुल्ल देसाई: मालवण, मोबा ९४२२५८४७५९