माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी छापा मारला आहे. गेल्या दोन महिन्यांत ईडीने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर केलेली ही दुसरी कारवाई आहे. ईडीच्या या धाडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज शनिवार दि.११ मार्च रोजी ईडीने पहाटेच धाड टाकली. ईडीचे सात अधिकारी पथकासह हसन मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तर, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सध्या हसन मुश्रीफ मुंबईत असल्याचं सांगण्यात येत आहे. कागल येथील घरी मुले आणि कुटुंबातील महिला आणि नातवंडे असल्याची माहिती आहे. ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. “समाजासाठी हसन मुश्रीफ एवढं काम करत आहेत. पण, असे असलं तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,” अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.दरम्यान, धाडीची माहिती मिळताच मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक होत निवास्थानाबाहेर गोळा झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि कोल्हापूर पोलीस दलाची मोठी यंत्रणा हसन मुश्रीफ यांच्या निवास्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे.