अमळनेर: माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचं निधन‘ मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईल’, म्हणत संपूर्ण विधानसभा वेठीस धरून विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे तत्कालीन मुलुख मैदानी तोफ माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, (दि. २३) दुपारी २ वाजता दहिवद येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील, तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.गुलाबराव पाटील १९७८ ला पहिल्यांदा ‘पुलोद’ सरकारमध्ये निवडून आले. नंतर अडीच वर्षांत सरकार बरखास्त झाले. पुन्हा १९८०मध्ये निवडून आले. १९८५ मध्ये अमृतराव पाटील यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर १९९० ते ९५ दरम्यान ते पुन्हा आमदार झाले. तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे ते आमदार होते. संविधानावरील वकिलांच्या चर्चासत्रात दहावी शिकलेले एकमेव गुलाबराव पाटील सहभागी झाले होते. त्यांनी ‘साथी संदेश’ वृत्तपत्रही काढले होते. त्यांची निर्भीड पत्रकारिता खूप गाजली होती. त्यांना साथी गुलाबराव म्हणूनदेखील ओळखत होते. त्यांच्या वक्तृत्वाचा इतका प्रभाव होता, की जाहीर सभेत मध्यंतर घेऊन पुन्हा सभा घेणारे आचार्य प्र. के. अत्रे यांच्यानंतर ते एकमेव होते. अमळनेरात शिक्षणासाठी चांगली शाळा असावी म्हणून त्यांनी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून सानेगुरुजींच्या नावाने शाळा सुरू केल्या. एखाद्याच्या गोटात जाऊन त्याची माहिती काढून विधानसभेत मांडत असत. शरद पवार, शंकरराव चव्हाण, भाई ठाकूर, हितेंद्र ठाकूर, एकनाथ खडसे आदींसह अनेकांवर त्यांनी बेधडक टीका केली होती. विरोधकांवर सभागृहात जितके आक्रमकपणे ते बोलत होते, तितकेच त्यांचे सभागृहाबाहेर मैत्रीचे संबंध होते.