मसुरे प्रतिनिधी:
महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग अध्यक्ष पदी सिंधू कन्या सन्मा.ज्योतिका दिपक हरयाण यांची निवड एक मताने नुकतीच करण्यात आली आहे.पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉक्टर स्मिता पाटील , कार्याध्यक्ष श्रुती उरणकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
सौ.ज्योतिका हरयाण यांनी १७ जुलै २०२० ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावर उत्तम प्रकारे काम केले आहे.जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी महिलांच्या समस्या उत्तम प्रकारे हाताळल्या.त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात राबवले.दहावी तसेच बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन दिले.जनतेच्या हिताच्या गोष्टी समाजासमोर आणणारे पत्रकार तसेच ज्यांच्यामुळे महिला बिनधास्तपणे समाजात वावरत आहेत ते पोलीस या सर्व रक्षणकर्त्यांना आपले बंधू मानून त्यांनी दरवर्षी आपल्या समितीच्या महिलांना सोबत घेऊन रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा केला.जिल्ह्यातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील समस्या जाणून घेऊन त्यांना आर्थिक योगदान तसेच वस्तू स्वरुपात मदत करून त्यांना पाठबळ दिले.एखाद्या महिलेवर मोठा प्रसंग आला तर जिल्ह्यातील समितीच्या सर्व महिलांना एकत्र करून त्या महिलेची भेट घेऊन तिची विचारपूस करून तिला आर्थिक पाठबळ देऊन त्या महिलेची समस्या सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला.कोरोना काळामध्ये अनेक रूग्णांची गैरसोय होऊ दिली नाही.अनेक रुग्णाची भेट घेऊन चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय स्वतः करून दिली.जिल्हयामध्ये रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून रक्तदान शिबीराचं आयोजन केलं. तळागाळातील कर्तुत्ववान महिलांचा आदरयुक्त सन्मान करून महिलादिन साजरा केला.पुरग्रस्तांना मदत केली अशी कित्येक समाज उपयोगी कार्ये ज्योतिका हरयाण यांनी केली आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ,त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची कोकण विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे त्याबद्ल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तिथवली ग्रामस्थ सेवा समिती, जिल्ह्यातील महिला वर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी बोलताना ज्योतिका हरियाण म्हणाल्या मिळालेल्या पदाचा उपयोग समाजातील तळागाळातील गरजवंत महिला आणि सर्व स्तरावरील समाजातील बांधवांसाठी त्यांच्या विविध उपेक्षित प्रश्नांना न्याय देण्यासाठी करणार आहे. तसेच महिला उत्कर्ष समिती ला गर्व वाटेल असे काम यापुढे करणार आहे.