Home स्टोरी महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार!

महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार!

157

१४ मे वार्ता: संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात ८ जून २०२३ रोजी मान्सून प्रवेश करणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यात २२ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणखी चार ते पाच दिवस तापमान वाढलेले राहणार आहे. सुमारे ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचणार आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत मे महिन्यात पुन्हा एकदा ११ ते १६ मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. १७ मे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल. यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची कामे १६ मेपर्यंत पूर्ण करून घ्यावी, मान्सूनचा पाऊस ८ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. २२ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे. यानंतर २६ व २७ जूनला शेतकरी बांधवांनी खरिपाच्या पेरण्या कराव्या. जुनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येसुद्धा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.