मुंबई: आपल्या देवतांचा मान आपणच ठेवायला हवा. त्यामुळे गणेशोत्सवाच्या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू करणे योग्य आहे. प्रत्येकाने या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशेत्सवांच्या ठिकाणी वस्त्रसंहिता असायला हवी, असे मत शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री सय्यद खान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी व्यक्त केले.
मुंबईतील एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी तोकडे कपडे घालून नेण्यास मनाई करण्यात आली आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. या वेळी दीपाली सय्यद खान म्हणाल्या, ‘‘काही लोक याला विरोध करत आहेत; परंतु यामध्ये विरोध करण्यासारखे काय आहे ? उलट हे चांगलेच आहे. आपण देवाकडे कशासाठी जातो ? आपणच आपल्या धर्माचा आदर केला नाही, तर अन्य काय करणार ?’’