Home स्टोरी मसुरेतील जुन्या पिढीतील काँग्रेस नेते तुकाराम मेस्त्री यांचे निधन..

मसुरेतील जुन्या पिढीतील काँग्रेस नेते तुकाराम मेस्त्री यांचे निधन..

122

मसुरे प्रतिनिधी: 

मसुरे चांदेर मायनेवाडी येथील ज्येष्ठ समाजसेवक तसेच जुन्या काळातील काँग्रेस चे जेष्ठ नेते, जेष्ठ गणेश मूर्तिकार, ज्येष्ठ भजनी बुवा तुकाराम विठ्ठल मेस्त्री वय ९२ वर्षे यांचे नुकतेच वार्धक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तुकाराम मिस्त्री यांच्या निधनामुळे मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.

तुकाराम मेत्री जुन्या काळातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता माजी मंत्री स्वर्गीय बापूसाहेब प्रभूगावकर,माजी मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसची धुरा हाती घेतली होती. त्यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते आणि यातूनच त्यांनी गावातील विविध प्रश्न सोडविले होते.

त्या काळातील शासकीय ठेकेदार म्हणून त्यांचे मोठे नाव होते. जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते, अनेक पूलांचे काम त्यांनी केले होते. डंपर व्यवसायातून त्यांनी अनेक जणांना रोजगार मिळवून दिला होता. मसुरे गावात ते ज्येष्ठ भजनी बुवा तसेच ज्येष्ठ गणेश मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध होते. संगीत क्षेत्रात त्यांचे मोठे ज्ञान होते. मृदुंग, तबला, पेटी, ताशा, चकवा, टाळ ही वाद्ये वाजविण्यात ते माहीर होते. तसेच ते उत्कृष्ट चित्रकारही होते. दशावतार क्षेत्राचा त्यांचा मोठा गाढा अभ्यास होता. अनेक दशावतार कलाकार त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत होते.

गावातील सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकारणात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे सुतार काम हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होते.

गणपती विसर्जन मधील त्यांची गाऱ्हाणी ही अतिशय रुदयाला भिडणारी असायची. गावातील गोरगरीब जनतेचे ते कैवारी होते. अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मेस्त्री, गुरुप्रसाद मेस्त्री तसेच प्रसिद्ध दशावतार मृदुंग वादक अनिल मेस्त्री यांचे ते वडील आणि प्रसिद्ध आर्टिस्ट दत्तप्रसाद मेस्त्री, संदीप मेस्त्री यांचे ते आजोबा होत.