पत्रकार दिनी जिल्ह्यातील गुणवंत पत्रकारांना पुरस्कार प्रदान….!
मसुरे प्रतिनिधी: पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही, पत्रकाराने एकाद दुसरा विषय निवडून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहीजे. त्या विषयाची स्पेशालिटी तुमच्याकडे असली पाहिजे. पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती टिकवून ठेवता आली पाहीजे, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी टिकवून ठेवलेली आहे, असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार कार्यक्रम पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, जिल्हाबँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलयंत, संघाच्या सचिव देवयानी ग्ररसकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, नंदकिशोर महाजन बाळ खडपकर,विद्याधर कैनवडेकर, रमेश जोगळे, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, महेश रावराणे, दाजी नाईक, संदीप देसाई, लघु, खरवत, महेश रावराणे आदी उपस्थित होते.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना बाळशास्त्री जांभेकर यांचे भवन उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे. हे भवन म्हणजे बाळशास्त्री यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचं जन्म गाव असलेल्या पोंभुर्ले गावाला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. जिल्हयातील पत्रकारीता वेगळ्या उंचीची पत्रकारिता आहे. शासन योजनेत पत्रकारांचं सहकार्य महत्वाचे आहे. समाजाचा आरसा पत्रकार असतो. असे प्रतिपादन केले.आमदार वैभव नाईक यांनी बोलताना बाळशास्री जांभेकर जिल्ह्याचे सुपुत्र असल्याचा अभिमान आहे. त्यांचा वारसा जपणाऱ्या पत्रकाराने आपली पत्रकारीता स्वस्त होऊ देऊ नये. पत्रकाराने आपला दर्जा कमी करुन घेऊ नये, असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भोसले यांनी राज्यात युती आणि आघाडीचे राजकारण सुरु झाल्यावर राज्याची घसरण सुरु झाली आहे. असे ठाम मत व्यक्त केले. तसेच पत्रकाराने सर्व प्रश्नांकडे जागरुकतेने बघितले पाहीजे. सोशल मिडियामुळे आता फार मोठे बदल झाले आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचल्याशिवाय आता चालू शकते असा दिवस येण्यापूर्वी पत्रकाराने जागे व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, गणेश जेठे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी अध्यक्षीय भाषणात जिल्हा पत्रकार संघाचे विविध उपक्रम आणि आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती देऊन पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी पाठीशी असल्याचे बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या सचिव देवयानी वरसकर यांनी केले. सुत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले.स्वागत उमेश तोरस्कर यांनी केले, तर आभार संतोष सावंत यांनी मानले. यावेळी तरुण भारतचे मुख्य उपसंपादक अवधूत पोईपकर यांना आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार , मसुरे प्रतिनिधी दत्तप्रसाद पेडणेकर यांना आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार, दोडामार्ग प्रतिनिधी गणपत डांगी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार वितरण –
जिल्हा पत्रकार संघामार्फत वितरीत करण्यात आलेल्या अन्य पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार माधव कदम, ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवलीचे चंद्रशेखर तांबट, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडीचे श्रीधर साळुंखे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरीचे नंदकुमार आगरे, कुडाळचे प्रमोद म्हाडगुत वेंगुर्लाचे प्रथमेश गुरव, देवगडचे दयानंद मांगले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले.