७ सप्टेंबर वार्ता: महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करून त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचा त्यासाठी कडाडून विरोध आहे, असं स्पष्टपणे भानुदास माळी यांनी सांगितलंय.
हा भाजपचा आणि आरएसएसचा कुटिल डाव आहे, तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. परंतु, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे.
भानुदास माळी म्हणाले, ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती पाहता ओबीसींचे सर्वच क्षेत्रातील आरक्षण आधीच धोक्यात आलेले आहे. त्यातच मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करून ओबीसींचे आरक्षण पूर्णपणे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण काही जिल्ह्यांमध्ये दोन, पाच आणि आठ टक्के आहे. त्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. भाजपने खासगीकरणाच्या नावाखाली सर्व सरकारी कंपन्या आपल्या मित्रांच्या घशात घालून सरकारी नोकरीमधील आरक्षण संपुष्टात आणले आहे. आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले, तरच ते न्यायालयीन प्रक्रियेत टिकेल अन्यथा मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य नाही. मराठा समाजाला विनंती करतो की आंदोलने, जाळपोळ, उपोषण करून आपणास आरक्षण मिळवता येणार नाही.
केंद्र सरकारने घटनात्मक आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली पाहिजे, तरच मराठा तसेच ओबीसी समाजाला योग्य ते आरक्षण मिळेल. गेली कित्येक वर्षे ओबीसी समाज जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. परंतु, केंद्र सरकार अशा प्रकारची जनगणना करण्यास व इम्पेरिकल डेटा देण्यास सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही. जर जातनिहाय जनगणना झाली तर सर्वच समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल, असंही माळी यांनी सांगितलं.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा भाजपचा आणि आरएसएसचा कुटिल डाव आहे, तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही माळी यांनी दिला आहे.