भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नांदेडमध्ये असूनही एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला आले नाही. मुनगंटीवारांप्रमाणेच इतरही मंत्री आणि नेत्यांनी मराठवाड्यातल्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रम होता मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळ्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याचा. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेडमध्ये असूनही अर्जापुर इथल्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह एकही लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. नेते आणि अधिकाऱ्यांची ही अनास्था पाहून हा सोहळा कशासाठी आयोजित केला होता? हाच प्रश्न विचारला जातोय. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उरकण्यात आलाय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित नांदेडमध्ये आजपासून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती असणार होती, त्यासोबतच हिंगोली लातूरच्या खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच निमंत्रण पत्रिकेवर जिल्ह्यातील अकरा आमदारांची देखील नावे टाकली होती. यापैकी केवळ नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि देगलूर बिलोलीच्या तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे उदघाटन उरकण्यात आले. सुधीर मुनगंटीवार हे नांदेडचे जावई आहेत. ते कालपासून नांदेडमध्ये आहेत. सासुरवाडीत असलेल्या वाढदिवस आणि लग्न सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. मात्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी लावण्यास मुनगंटीवार यांना वेळ मिळाला नाही याचे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Home स्टोरी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन सोहळ्याला सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित