गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते सन्मान.
चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
कणकवली प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यकर्ते तथा समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांचा मुंबई एकदा कल्चर अकादमीच्या महात्मा फुले सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुंबई गिरगाव साहित्य संघात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विख्यात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते सदर पुरस्काराने मातोंडकर यांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई एकता कल्चर अकादमीतर्फे दरवर्षी चित्रपट नाटक संगीत सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षीच्या २०२३ च्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना गौरविण्यात आले तर सांस्कृतिक विभागात सिंधुदुर्गातील सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांचा महात्मा फुले पुरस्काराने गौरव करण्यात आला. मातोंडकर हे तळकोकणातील अग्रगण्य साहित्य चळवळ असलेल्या समाज साहित्य प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष असून गेली 25 वर्ष सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. नव्या तरुणाईने ग्रंथ वाचनाकडे वळावे म्हणून त्यांनी ग्रंथ भेट हा उपक्रमही राबविला असून साहित्य क्षेत्रात नव्याने पुढे जाणाऱ्यांसाठी ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या संकल्पनेतून अलीकडेच मुंबई येथे समाज साहित्य विचार संमेलन यशस्वी करण्यात आले. या सगळ्याची दखल घेऊन त्यांचा एकता कल्चरलतर्फे महात्मा फुले सांस्कृतिक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
माझ्यासारख्या कोकणातील ग्रामीण भागात सांस्कृतिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची दखल घेऊन महात्मा फुले सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आला. यामुळे पुढील काळात काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आपण निष्ठेने समाजासाठी कार्यरत राहिलो तर आपोआप अशी दखल समाजात घेतली जाते. हे या पुरस्काराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, याचा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया सदर पुरस्कार स्वीकारताना श्री मातोंडकर यांनी व्यक्त केली. यावेळी एकता अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, डॉल्बी गीत फेम गायक नागेश मोरवेकर, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, चित्रकार गायक भगवान दास, हिंदी अनुवादक रमेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.